कोडजिम कन्फ्युशियस

पातळी 1

"पहिल्या पातळीला पोचल्याबद्दल अभिनंदन!"

"धन्यवाद! मला वाटले त्यापेक्षा हे सोपे निघाले."

"आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हे रंजकसुद्धा होते."

"हे अजून रंजक होणार आहे. तू बघशील. तू तयार आहेस का?"

"चला, सुरुवात करूया!"

भविष्य इथे आलेलेच आहे

20 व्या शतकातील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये व्हॅक्युम क्लिनर, वॉशिंग मशीन, टीव्ही, आणि गाड्या अशा गोष्टी होत्या.

जर तुम्ही अजूनही हाताने कपडे धुवत असाल, घोडेस्वारी करत असाल, किंवा मेणबत्त्या वापरत असाल, तर 20 व्या शतकातले लोक म्हणतील की तुम्ही 1800मध्ये रहात आहात.

21 व्या शतकाची वैशिष्ट्ये म्हणजे इंटरनेट, मोबाईल फोन, स्काईप आणि सोशल नेटवर्क्स.

इंटरनेट तुम्हाला सर्व मानवी ज्ञानापर्यंत पोचू देते. तुम्ही ऑनलाईन काम करू शकता किंवा तुमचा स्वत:चा ऑनलाईन व्यवसाय करू शकता, ऑनलाईन शिक्षण घेऊ शकता, किंवा ऑनलाईन शिकवू शकता.

सोशल नेटवर्क्सच्या माध्यमातून तुम्ही मित्रमैत्रिणी, नोकरी, बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड, छंद गट, इ.शोधू शकता. तुम्हाला जगातल्या जवळजवळ कोणत्याही व्यक्तीची माहिती मिळू शकते, आणि तुम्ही तिला किंवा त्याला सल्ला किंवा मदत मागू शकता. तुम्ही संपूर्ण जगातील व्यक्तींशी मैत्री करू शकता, त्यांना भेटू शकता, त्यांना आमंत्रण देऊ शकता, किंवा एकत्र सहलीला जाऊ शकता.

तुम्ही स्काईपवर तुमच्या मित्रमैत्रिणींशी, भावांशी, बहिणींशी, पालकांशी, नातेवाईकांशी, किंवा कोणत्याही देशातल्या कोणाशीही गप्पा मारू शकता. जगातल्या कोणत्याही ठिकाणाहून मोफत दुतर्फा व्हिडिओ संवाद ही एक अशी गोष्ट आहे ज्याची आपण 20 वर्षांपूर्वी कल्पनासुद्धा करू शकलो नसतो. आज, ही गोष्ट सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा भाग आहे.

गुगल स्ट्रीट व्ह्यू तुम्हाला कोणत्याही देशातल्या कोणत्याही शहराच्या रस्त्यावरून आभासी फेरफटका मारू देतो. तुम्हाला तुमचे उर्वरीत आयुष्य कुठे घालवायचे आहे ती जागा तुम्ही निवडू शकता आणि मग तिथे जाऊन राहू शकता.

आधुनिक स्मार्टफोन्समुळे त्यांचे मालक इतर लोकांशी गप्पा मारू शकतात किंवा संदेश पाठवू शकतात, छायाचित्रे पाठवू शकतात, वेबवर माहिती शोधू शकतात, आणि लाखो मोफत ऍप्स मिळवू शकतात. आणि अजून काय? व्हिडिओ कॉल करा, संगीत ऐका, व्हिडिओ पहा, व्हिडिओ तयार करा किंवा छायाचित्रे काढा, नकाशावर तुमचे स्थान शोध, नोंदी घ्या, कॅलेंडर अॅप्स वापरा, सोशल नेटवर्कवर समाजात मिसळा, आणि, अर्थातच, मांजराच्या गोड पिल्लांची छायाचित्रे असलेल्या पोस्ट्सना अपवोट करा.

तुम्ही प्रवासाच्या दरम्यान ऑडीओ अभ्यासक्रम ऐकून एका वर्षात परदेशी भाषा शिकू शकता. कोणतीही माहिती, कोणतेही क्रमिक पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे. जगातील सर्वोत्तम महाविद्यालयातली सबटायटल असलेली व्हिडीओ व्याख्याने पहायची आहेत? काही अडचण नाही: त्यांचा आनंद घ्या.

तुम्ही एखादं पुस्तक लिहू शकता, Amazon.com ते अपलोड करू शकता आणि भरपूर पैसे मिळवू शकता. काहीशे रुपये देऊन तुम्ही स्वत:ची वेबसाईट तयार करून घेऊ शकता आणि एक जागतिक ऑनलाईन व्यवसाय चालवू शकता.

20व्या शतकात जगण्याबद्दल पुष्कळ झाले, काय शिकायचे, कधी परीक्षा द्यायची, काय करायचे, आणि कुठे राहायचे, हे कुणीतरी सांगेल म्हणून वाट पाहायची! आता तू ठरवायचे आहे. तुझे आयुष्य बदलणाऱ्या संधी सगळीकडे आहेत.

एका जुन्या विनोदाने शेवट करूया:

कोणे एके काळी, महाभयंकर पूर आला. सगळेजण पळून जायचा प्रयत्न करत होते. अपवाद फक्त एक धार्मिक माणसाचा. तो घरीच थांबून देवाची प्रार्थना करत होता.
ट्रकमधून जाणारे काही लोक त्याला ओरडून म्हणाले,
"मारा उडी, जीव वाचवा स्वत:चा!"
"मी प्रार्थना करतो आहे आणि देवाच्या आज्ञा आयुष्यभर पाळत आलो आहे. देवच मला वाचवेल," असे तो पुरात अडकलेला माणूस म्हणाला.
जेव्हा पाणी त्याच्या खिडक्यांपर्यंत पोचले, तेव्हा एक होडी त्याच्याकडे आली. त्यांनी तीच मदत देऊ केली, त्याने तोच प्रतिसाद दिला.
मग पाणी छपरापर्यंत पोचले. तो माणूस छपरावर चढून प्रार्थना करत राहिला.
मग एक हेलिकॉप्टर आले. त्यांनीही पुन्हा तीच मदत देऊ केली, त्याने तेच उत्तर दिले.
शेवटी, तो माणूस बुडला आणि स्वर्गात गेला, तो देवाला रागाने म्हणाला:
"मी नेहमी प्रार्थना करतो आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात चांगला वागलो. मग तू मला बुडू का दिलेस?"
"मी तुझ्यासाठी एक ट्रक पाठवला, एक होडी पाठवली, आणि एक हेलिकॉप्टर पाठवले. तुझी अजून काय अपेक्षा होती?"